संकलन संदर्भात विचार
मा. यशवंतराव चव्हाण यांच्या असामान्यत्वाचे पैलू त्यांच्या चौफेर व्यक्तीमत्वाचा वेध घेतला की जवळून पाहता येतात. चव्हाण साहेबांचे त्यांच्या 'कृष्णाकाठ', 'सह्याद्रीचे वारे सारख्या पुस्तकांतील लेखन असो, किंवा त्यांची विचारप्रगल्भ भाषणे असोत, किंवा त्यांच्या शेकडो स्नेही चाहत्यांनी त्यांच्यावर लिहीलेली विविध भाषांतील पुस्तके असोत, ते केवळ साहेबांचे असामान्यत्वच फक्त सांगतात असे नाही, तर त्यातून महाराष्ट्र, भारत आणि जगाच्या इतिहासाचे महत्वाचे टप्पेही आपल्यासमोर उलगडले जातात.
असेच एक संदर्भाचे भांडार म्हणजे साहेबांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार आणि त्यांनी जपलेली कागदपत्रे आपलं गाव, आपला जिल्हा, आपले राज्य, आपला देश आणि देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध अशा प्रत्येक टप्याशी साहेब क्षणोक्षणी जोडलेले होते. कोणताही मोठा कार्यक्रम करायचा असला की त्यात साहेबांची उपस्थिती सर्वांना हवीशी वाटत असे. साहेब मुंबईत असोत की दिल्लीत. आलेल्या पत्रांना व्यक्तिगत स्नेहाचा स्पर्श करणारे आपुलकीचे उत्तर ते लिहीत असत. आलेली पत्रे जपून ठेवण्याकडे, व त्याला लिहीलेल्या उत्तराची प्रत त्यासोबत जतन करण्याकडे त्यांचा कल असे. अशा पत्रांची आणि त्या सोबतच्या अन्य कागदपत्रांची संख्या दीड लाखांहून अधिक आहे. माणसं जमवण्याची आणि आपल्या अचाट स्मरणशक्तीच्या साथीने त्यांना पत्रसंपर्कातून जपण्याची साहेबांची क्षमता असामान्य होती.
साहेबांच्या पत्रव्यवहाराच्या व त्या सोबतच्या कागदपत्रांच्या मूळ प्रतींच्या शेकडो फाईल्स यशवंतराव चव्हाण सेंटरने कराड येथील साहेबांच्या 'विरंगुळा' ह्या निवासस्थानी अत्यंत काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या आहेत, त्यातील १,७०,४९६ महत्वाची कागदपत्रे डिजिटाईज करून, व त्यांचे नियोजनबद्ध वर्गीकरण करून तो संग्रह प्रस्तुत पोर्टेबल हार्ड डिस्कमध्ये संदर्भासाठी जतन करण्यात आला आहे. मूळ कागदपत्रे वारंवार हाताळली जाऊन खराब होऊ नयेत, व त्याच वेळी अभ्यासक व जिज्ञासूंना ती कागदपत्रे संदर्भ वा अभ्यासासाठी पाहायची असल्यास विनासायास पाहता यावीत यासाठी ह्या डिजिटायझेशन प्रकल्पाचा संकल्प योजला.
कागदपत्र संकलनाचे वर्गीकरण
साहेबांनी जपलेली एकूण १.७० लाख मूळ कागदपत्रे हा अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि जिज्ञासू यांच्या दृष्टीने अतिशय अमूल्य असा ठेवा आहे.
त्यांचे वर्गीकरण एकूण अकरा विभागांमध्ये करण्यांत आले आहे.
वरील सर्व डिजिटल कृत केलेले कागदपत्रे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे, संदर्भकरिता सर्वाना बघता येईल.