समग्र साहित्य सूची

YCHAVAN SAHITYA SUCHI
समग्र साहित्य सूची

संपादक : वि. वि. पाटील
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत

कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर अवतरलेलं यशवंतराव चव्हाण हे व्यक्तिमत्त्व संपूर्ण भारत वर्षास आदरणीय असणारं असं व्यक्तिमत्त्व होतं.

'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' म्हणून त्यांचा गौरव केला जातो. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या या व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राची आणि मराठीची अस्मिता आपल्या आयुष्यभर जोपासली. ''माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वारकर्‍याच्या निष्ठेनं काम करीन'' ही त्यांची जाणीव मराठी मनाला उभारी आणणारी आहे. तसेच ''हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री छातीचा कोट करील'' यासारखी त्यांची विधाने महाराष्ट्राच्या पुरुषार्थाची विधाने आहेत.

यशवंतरावांनी नुसती विधाने केली नाहीत तर त्याप्रमाणे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार, शिक्षण, शेती, दलित आणि साहित्य यासारख्या विविध क्षेत्रांतून आपल्या कर्तबगारीने आणि सातत्याच्या संचाराने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

प्रत्येक क्षेत्रात यशवंतरावांची विचारसरणी आजही नवीन पिढयांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरली आहे. मा.यशवंतरावांचे हे विचार त्यांनी जेव्हा प्रसृत केले तेव्हा तेव्हा त्यावर अनेकांनी ग्रंथनिर्मिती केली. यशवंतरावांच्या विचारसरणीमुळे खरे तर आज नाशिक येथे 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा'ची स्थापना झाली आहे. त्यातून 'ज्ञानगंगा घरोघरी' या ब्रीदाचा तोडर महाराष्ट्रात गर्जत आहे.

खरे पाहिले तर, स्वत: यशवंतराव चव्हाण ही व्यक्तीच एक मुक्त विद्यापीठ होतं. त्यांच्या मुक्त चिंतनातून जे जे अवतरलं ते पिढयांच्या चाळणीतून राहिलेलं अमर असं वाङ्मय आहे. या वाङ्मयाचा अभ्यास करण्याची, संकलन करण्याची, संग्रह करण्याची भावना माझ्या मनात यशवंतराव चव्हाण हयात असतानाच उदीत झाली. त्यांतून अनेक ग्रंथ माझ्या पाहाण्यात आले. त्यांचे संग्रह केले, पदरमोड करून खरेदी केली. अनेक संशोधकांना, अभ्यासकांना त्याचा लाभ घडविला. आणि हे सर्व वाङ्मय पुन्हा मी नाशिकच्या 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा' ला देणगी म्हणून देऊन टाकले.