महाराष्ट्रातील दुष्काळ

Maharashtratil Dushkal


महाराष्ट्रातील दुष्काळ आणि

जलसंपत्तीचे नियोजन परिसंवाद

संपादक : डॉ. अण्णासाहेब शिंदे
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

प्राक्कथन

प्राचार्य पी. बी. पाटील
सरचिटणीस, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान महाराष्ट्रातील शेती आणि ग्रामीण कृषि औद्योगिक विकासाच्या उद्योग समस्यांचे वास्तव रूप समजून घेण्यासाठी विविध चर्चा-विनिमय बैठका व परिसंवाद संयोजित करत असते.  तज्ज्ञांच्या सहकार्याने वैचारिक देवाण-घेवाण आणि संबंधित कार्यक्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांची शिबिरे आखून जनमत आजमावण्याची यशवंतराव चव्हाणांची विशिष्ट शैली होती.  महाराष्ट्राच्या अभ्युदयातला मोठा अडसर म्हणजे येथील पाण्याची दुर्भिक्ष.  हा सबंध प्रश्न 'दुष्काळ आणि पाणी' ह्या चर्चा शिबिरात मार्च १९८८ मध्ये विचारार्थ घेतला गेला.

त्या वेळी चर्चेचे नेतृत्व महाराष्ट्रातील पाणी समस्येबाबत सतत लोकजागृतीचा आग्रह बाळगणारे आमचे ज्येष्ठ नेते व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आणि भारत सरकारचे नामवंत माजी शेतीमंत्री माननीय श्री. अण्णासाहेब शिंदे ह्यांनी आनंदाने स्वीकारले होते.  त्या चर्चा शिबिरात त्यावेळी जे वैचारिक मंथन झाले, त्यातून महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्तीचे नियोजन हा ग्रंथ प्रतिष्ठानने तयार केला आहे.  प्रत्यक्ष शिबिराच्या वेळी 'दुष्काळ आणि पाणी' नामक एक छोटा निबंध-संग्रह शिबिरातील चर्चेचे नियमन करण्यासाठी आधारभूत साहित्य म्हणून शिबिरात सामील झालेल्या सर्वांना देण्यात आला होता.  शिबिरात पाणी व दुष्काळ, यासोबत पाणी-वाटप, दुष्काळाचा विचार करून शेतीची पुनर्आखणी, पाणी संचयन, धरण-बांधणी, पीक पुनर्रचना, शेतीवर आधारलेले औद्योगिकीकरण असेही प्रश्न शिबिरात जाणत्यांनी उभे केले.  अशा प्रकारे शेती, शेतकरी व ग्रामीण विकास हे प्रश्न मोठ्या आग्रहाने चर्चिले गेले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे क्रियाशील व्यासपीठ बनावे ही प्रतिष्ठानच्या स्थापनेमागील भूमिका आहे.  ह्या व्यासपिठावरून पक्ष, जात व भेद विसरून महाराष्ट्राच्या सर्वगामी विकासाचा सतत विचार व्हावा असा आग्रह आहे.  त्यास अनुसरून 'महाराष्ट्रातील दुष्काळ, शेतीचे प्रश्न व जलसंपत्तीचे नियोजन' ह्याबाबतचा सर्वसमावेशक प्रश्न ह्या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे.  पाणी ह्या प्रश्नाशी संबंधित संशोधन करणार्‍या 'वाल्मी' या औरंगाबादेतील नामवंत संस्थेतर्फे उपलब्ध होऊ शकलेली पाणी व्यवस्थापन विषया संबंधित संधोधित निबंध; पाणी व अवर्षणाच्या निरोधासाठी स्थापन झालेल्या आयोगांच्या शिफारशींचे संकलन आणि अभ्यासकांना भौगोलिक दृष्ट्या नेटकी माहित देणारे निवडक नकाशे आग्रहाने तयार करवून घेण्यात आले.  मुंबई व शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथपालांनी व वाल्म संस्थेच्या संचालकांनी महत्त्वाच्या ग्रंथांची सूची अगत्यपूर्वक पाठवल्या.  हा ग्रंथ रसिक वाचक, जिज्ञासू अभ्यासक संशोधक आणि ग्रामीण परिसरातील सेवाभावी संस्थांना भरवशाचा मार्गदर्शक ठरू शकेल असा वाटतो.

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि
   जलसंपत्तीचे नियोजन परिसंवाद