न्या. नरेंद्र चपळगावकर

न्या. नरेंद्र चपळगावकर

निष्कलंक नेता
स्वातंत्र्य सैनिक. साहित्यिक, रझाकार विरोधी आंदोलनात कार्य. मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधिश

यशवंतरावांचे स्मरण आज त्यांच्या निष्कलंक चारित्र्यातही सुद्धा केले पाहीजे. आज मूल्यांची घसरण राजकारात एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की, सत्तेत राहूनही आर्थिक गैरव्यवहार न करणारी माणसे फारच कमी सापडू गलेली आहेत. अशा काळात यशवंतरावांचा आदर्श निदान महाराष्ट्रातल्या सर्व पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांनी ठेवावयास हवा.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात समाविष्ट व्हावेत कारण स्वातंत्र्यानंतर देशाची धुरा त्यांनाच वाहवयाची आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना कॉग्रेसमध्ये आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. काकारसहेब गाडगीळ यांनी दे. भ. केशवराव जेधे यांना काँग्रेस पक्षात आणले आणि गाडगीळ जेधे ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात गाजली. १९४२ च्या चळवळीच्या सुमाराला महाराष्ट्रातील बहुजनसमाजाचे अनेक कायकर्ते कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते त्यांनी चळवळीतही भाग घेतला. यशवंतराव चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील अशाच कार्यकर्त्यांपैकी एक महत्त्वाचे कार्यकर्ते. दीर्घकाळपर्यंत यशवंतरावजी सत्तेमध्ये होते. महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून, नंतर द्विभाषिकाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या प्रारंभकाळात मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली, चिनी आक्रमणानंतर भारताचे संरक्षणमंत्री म्हणून आणि नंतर गृहमंत्री व उपपंतप्रधान अशा विविध जबाबदाऱ्यांच्या जागांवर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी काम केले.

यशवंतरावांचे खरे कर्तृत्व महाराष्ट्राच्या राजकीय पुनर्बांधणीत आहे. स्वातंत्र्य हेच लढ्याच्या काळात एकमेव लक्ष्य असल्यामुळे आरंभकाळात त्या काळातील अधिक सुशिक्षित असलेल्या व समाजाचे नेतृत्व करणाऱ्या वर्गातूनच स्वातंत्र्यलढ्याचे बहुसंख्य कार्यकर्ते आले. स्वातंत्र्य लढ्याच्या नंतरच्या टप्प्यात विशेषत गांधीजींच्या नेतृत्वामुळे बहुजनसमाज मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य लढ्यात समाविष्ट झाला. स्वतंत्र झालेल्या देशाचा कारभार बहुजनसमाजातून आलेल्या कार्यकर्त्यानीच चालवला पाहिजे, त्यांनाच देशाच्या गरजा अधिक चांगल्या समजू शकतील ही दृष्टी यशवंतरावांसारख्या नेत्यांना होती. बहुजन समाजातील चांगले व गुणी तरुण हेरून त्यांना राजकारणात आणण्याचा त्यांचा प्रयत्न याच दृष्टीचा परिपाक होता. १९५३ ते १९६२या कालखंडात महाराष्ट्रातील कांग्रेस संघटना विस्तारीत झाली आणि तिला लोकांच्या पाठिंब्याचे दृढ बळ मिळाले, याचे बरेचसे श्रेय यशवंतरावांचे आहे.

सत्ता कोणाच्या हातात असावी व ती कोणासाठी राबवावी याबद्दल यशवंतरावांची दृष्टी स्वच्छ होती. कारभारात बहुजनसमाजाचा सहभाग महत्त्वाचा राहणार असला तरी हे राज्य सर्व महाराष्ट्रासाठी काम करणारे व सर्वांना सामावून घेणारे राज्य असेल हे त्यांनी अनेक वेळा सांगितले. हे राज्य एका जातीचे असणार नाही तर ते सर्व मराठी भाषिकांचे असेल असे निःसंदिग्ध आश्वासन त्यांनी दिले.

अनेक बुद्धिमत, विचारवंत, लेखक - साहित्यिक यशवंतरावांचे मित्र होते. विचारवंत आणि साहित्यिकांत सुद्धा जे आपल्याकडून व्यक्तिशः काही लाभ मागणार नाहीत असे निःस्पृह यशवंतरावांना अधिक जवळचे वाटले, त्यांचाच सल्ला मित्र म्हणून त्यांना महत्वाचा वाटला. सत्ता आली म्हणजे व्यक्तिगत स्वार्थाच्या लालसेने अवतीभोवती करणारी अनेक माणसे आसपास जमू लागतात, त्यांना दूर ठेवणे आवश्यक असते परंतु ते कठीण असते यशवंतरावांना ते जमलेले होते. राजकारण हा धकाधकीचा मामला आहे ते करीत असतानाही ज्यांना साहित्य आणि संस्कृती यांच्यातला प्रामाणिक रस जागा ठेवता आला त्यांचे आयुष्य अधिक समृद्ध झाले. महाराष्ट्राच्या नेत्यांपैकी यशवंतराव हेही एक असे नेते होते की ज्यांना वाङ्मय आणि संस्कृती यांच्यात रस होता. यशवंतरावांचे साहित्यविषयक प्रेम हे केवळ बाह्यअलंकरण नव्हते. त्यांचे वाचन चांगले होते आणि व्यक्तिगत ग्रंथालय ही समृद्ध होते त्यांनी आपल्या पत्नीला - वेणूताईंना लिहिलेली पत्रे त्यांच्या मनाच्या ऋजुतेची साक्ष देणारी आहेत मोठ्या पदावर असतानासुद्धा आपल्या आयुष्यातील जोडीदाराचे सतत स्मरण यशवंतरावांना होते व प्रत्येक महत्त्वाची गोष्ट तिला सांगावी असे त्यांना वाटत होते.

साहित्य हे मनावर आपोआप संस्कार करतेच. यशवंतरावांच्या आई, स्वातंत्र्याच्या चळवळीतले मूल्यनिष्ठ नेतृत्व, अनेक निःस्पृह स्नेही आणि साहित्याची सोबत हे यशवंतरावांना एक सुसंस्कृत राजकीय नेता बनविण्यासाठी कारणीभूत ठरले. धोरणाच्याबद्दल मात्र यशवंतरावांनी तडजोड केली नाही. यशवंतरावांची बांधीलकी काँग्रेस संघटनेशी होती म्हणून त्यांनी शिस्त नेहमीच पाळली. त्यांची बांधीलकी समाजाशी होली म्हणूनच शेतीविषयक धोरणे राबवताना त्यांनी श्रीमंत शेतकऱ्यांचा हिताचा विचार न करता सामान्य शेतकऱ्यांचा विचार केला.

यशवंतरावांचे स्मरण आज त्यांच्या निष्कलंक चारित्र्यासाठीसुद्धा केले पाहिजे, आज मूल्यांची घसरण राजकारणात एवढ्या प्रमाणात चालू आहे की सत्तेत राहूनही आर्थिक गैरव्यवहार न करणारी माणसे फारच कमी सापडू लागलेली आहेत अशा काळात यशवंतरावांचा आदर्श निदान महाराष्ट्रातल्या सर्व पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांनी ठेवावयास हवा.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com