यशवंतराव चव्हाण :एक स्मरण
लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू. लातूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष.
प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक राष्ट्रवादी काँग्रेचे क्रियाशील कार्यकर्ते.
यशवंतराव चव्हाणांजवळ फार मोठे प्रशासन कौशल्य होते. माणसे हाताळण्याची अप्रतिम हातोटी त्यांना सापडली होती. निष्कलंक चारित्र्य, पारदर्शक कारभार, मूल्यनिष्ठा, संवेदनशीलता, ज्ञानपरायणता, उपक्रमशीलता आणि दूरदृष्टी अशा दुर्मिळ गुणांचा समुच्चय त्यांच्या नेतृत्वात निर्माण झाला होता. ते गुण आजच्या राज्यकर्त्यांना निश्चित उपयोगी पडतील. यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी पुन्हा एकदा आपण कटिबध्द झाले पाहिजे. त्या दिशेतील आपले प्रयत्न हीच त्यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल.
सांस्कृतिक महाराष्ट्र - संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही मराठी जनतेची स्वप्नपूर्ती होती. निरनिराळ्या प्रांतात व विभागात विखुरलेल्या मराठी भाषकांना एकाच राज्यात एकत्रित जिवाभावाने नांदण्याची संधी त्यामुळे प्राप्त झाली. भारताच्या राजकीय नकाशावर महाराष्ट्र राज्य हे पहिल्यांदाच दिसले. सांस्कृतिक महाराष्ट्राला राजकीय महाराष्ट्राचे रूप प्राप्त झाले, सांस्कृतिक महाराष्ट्र हे मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे निर्गुण रूप होते आणि राजकीय महाराष्ट्र हे त्याचे सगुण रूप आहे. ज्या आनंदवन भुवनाचे स्वप्न समर्थ रामदासांनी पाहिले होते ते संयुक्त महाराष्ट्राच्या रूपाने साकार झाले असे म्हणावे लागेल.
संयुक्त महाराष्ट्राची राजमुद्रा मराठी माणसांचे एकभाषिक राज्य व्हावे म्हणून अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे तर एक प्रकारचा महासागर होता. त्यात काहींनी प्राणांची आहुती दिली. अनेक नेत्यांनी त्यासाठी फार मोठा संघर्ष उभा केला. त्यांच्या प्रयत्नाला शेवटी यश आले आणि त्या यशाचा मंगलकलश दिल्लीहून शिवनेरीवर आणण्याचा मान मात्र यशवंतराव चव्हाणांना मिळाला. खरे तर हा मराठी माणसाच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक क्षण होता. रायगडला पुन्हा एकदा जाग आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आकांक्षा मराठी माणसांनी पुन्हा एकदा पूर्ण केली आणि म्हणूनच नवमहाराष्ट्राने शिवाजी महाराजांची राजमुद्रा स्वीकारली.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते
शिवाजी महाराजांनी निवडलेली ही वाक्ये आम्ही नवमहाराष्ट्रासाठी घेतली. राजसत्ता ही लोककल्याणाकरिता राबवायचा संकल्प यशवंतराव चव्हाणांनी सोडला. हे नवे राज्य चंद्रकलेप्रमाणे वर्धिष्णू व्हावे ही श्रींची तसेच आम मराठी जनतेची इच्छा होती. ती इच्छा साकार करण्याचे काम नवमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या खांद्यावर इतिहासाने ठेवले. मराठी माणसांच्या इच्छा आकांक्षांची कावड खांद्यावर घेऊन त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. जनतेची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "..... आणि आज ह्या नव्या महाराष्ट्राचे जीवन एका नवीन तन्हेने घडावे, त्यात एक प्रकारची नवी आशा निर्माण व्हावी, त्यात एक प्रकारचे नवे सामर्थ्य निर्माण व्हावे आणि हे महाराष्ट्र राज्य त्याचे साधन व्हावे अशी जनतेची अपेक्षा आहे."
इतिहासाचे ज्ञान अन् मान - यशवंतरावजींना इतिहासाचे भान होते. इतिहासाचे ज्ञान व भान हे पुढची दिशा दाखवत असते. भविष्याचा वेध घेणारी दृष्टी यशवंतरावांना सुदैवाने लाभली होती. मराठी माणसाच्या मनात ऐक्यभावना निर्माण कशी होईल हा त्यांच्या समोरचा पहिला गंभीर प्रश्न होता. महाराष्ट्रात अठरा पगड जातींचे लोक राहतात याची त्यांना कल्पना होती. या अठरा पगड जातींच्या लोकांनीच कालच्या महाराष्ट्राचा इतिहास घडविला होता आणि आजचा महाराष्ट्रही त्यांनीच निर्माण केला आहे. या ठिकाणच्या सामाजिक कलहाचीही यशवंतरावांना पुरेपूर जाणीव होती. मराठी माणसाच्या वारशाचा त्यांना विसर पडणे शक्यच नव्हते. तो वारसा महाराष्ट्राला एकसंध राज्याच्या निर्मिती व विकासासाठी उपयोगी पडेल याची त्यांना खात्री होती आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या भाग्यविधात्यांचे स्मरण केले. महाराष्ट्राच्या विविध परंपरा व निरनिराळ्या प्रवृत्ती आहेत याची त्यांनी नवमहाराष्ट्राला आठवण करून दिली. त्या परंपरांमध्ये व प्रवृत्तींमध्ये ते ऐक्यबिंदू शोधीत होते.